निवडणुकीच्या तोंडावर पेट्रोल, डिझेल २ रुपये स्वस्त
लोकसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता असताना सरकारी इंधन कंपन्यांनी पेट्रोल व डिझेलच्या दरांत प्रत्येकी दोन रुपयांची कपात केली.
सत्यविचार न्युज :
लोकसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता असताना सरकारी इंधन कंपन्यांनी पेट्रोल व डिझेलच्या दरांत प्रत्येकी दोन रुपयांची कपात केली. आज, शुक्रवारी सकाळपासून ही दरकपात अस्तित्वात आली आहे.
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी ‘एक्स’ समाजमाध्यमावर याबाबत घोषणा केली. विशेष म्हणजे, दशकभरापूर्वीच पेट्रोल व डिझेलच्या दरांवरील नियंत्रण सोडल्यामुळे कंपन्यांकडूनच दरांची घोषणा केली जात होती. असे असताना गुरुवारी संध्याकाळी पुरी यांनी याबाबत माहिती देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार लोकाभिमुख निर्णय घेत असल्याची स्तुतिसुमनेही उधळली.
या दरकपातीमुळे मुंबईत पेट्रोलचा दर १०४.२१ रुपये तर डिझेलचा दर ९०.१५ रुपये प्रतिलिटर असेल. महाराष्ट्रात मूल्यवर्धित कर सर्वात जास्त असल्यामुळे सर्व महानगरांमध्ये मुंबईत इंधन सर्वात महाग आहे. तर राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर सर्वात कमी आहेत.