खेड (प्रतिनिधी)
बिबट्याच्या हल्ल्यात खेड तालुक्यातील धुवोली येथे बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि.१७ मार्च २०२३ रोजी ) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली.अजय चिंतामण जठार ( वय १८ रा. धुवोली, ता खेड ) असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
खेडच्या पश्चिम भागात असलेल्या धुवोली ता खेड येथील बारावीत शिकणारा अजय चिंतामण जठार हा शुक्रवारी दि १७ मार्च २०२३ रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्याच्या मित्रांसोबत घराजवळील डोंगरावर असेलेली जनावरे घरी आणण्यासाठी गेला होता. त्यावेळी दबा धरून बसलेला नरभक्षक बिबट्याने अजय वर हल्ला केला.त्याच्या मानेला पकडून करवंदाच्या जाळीत घेऊन गेला. हे दृश्य त्याच्या मित्राने पहिले. त्यांनी तेथून पळत येऊन जवळच असलेल्या घरातील लोकांना सांगितले. त्या घरातील लोकांनी इतरांना बोलावले. ग्रामस्थ घटनास्थळी गेले. तेथे अजयचा मृतदेह करवंदाच्या जाळीत आढळून आला ; तर चक्क तिथेच बिबट्याही नजरेस पडला. गावकर्यांनी आरडा ओरडा केल्यानंतर बिबट्या तेथून निघून गेला. बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेला अजय चिंतामण जठार हा सामान्य कुटुंबातील मुलगा आहे. घटनेनंतर तत्काळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळवण्यात आले. मात्र घटनास्थळी पोहचण्यास अधिकार्यांना रात्रीचे तब्बल साडेअकरा वाजले. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी पुण्यात असलेल्या आंदोलनास अधिकारी कर्मचारी गेले होते. त्यामुळे त्यांना येण्यास उशीर झाला. त्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
खेड तालुक्यात मानव आणि बिबटे यांच्यातील संघर्ष तीव्र होत चालला आहे. दोनच महिन्यापूर्वी २० जानेवारी २०२३ रोजी भिवेगाव ता खेड येथे एका ५५ वर्षीय शेतकऱ्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यानंतर हा दुसरा हल्ला आहे. यामुळे धुवोली परिवारातील गावांमध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे. नागरिकांनी त्यावेळी नरभक्षकी बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने ही दुसरी घटना घडली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या अजय याच्या मागे भाऊ, आई वडील असा परिवार आहे. या घटनेने संपूर्ण खेड तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे.