परीक्षा काळात वीजपुरवठासुरळीत ठेवण्याची मागणी,.
सत्यविचार न्युज :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने सध्या बारावीची वार्षिक परीक्षा सुरु आहे. तर येत्या शुक्रवार पासून दहावीची शालांत परीक्षा सुरु होत आहे. त्या पार्श्वभूमीवर महावितरण कंपनी व वीज मंडळाने वीज पुरवठा खंडित न करता परीक्षा कालावधीत अखंडितपणे सुरु ठेवावा, अशी मागणी भापसे पार्टीचे अध्यक्ष दिपकभाऊ ताटे यांनी केली आहे.
दहावी आणि बारावी हे वर्ष मुलांच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. त्यामुळे मुले मोठ्या जिद्दीने अभ्यास करत असतात. मात्र, वीज मंडळ भारनियमनाच्या नावाखाली वीज केंव्हा गायब करील, याचा थांगपत्ता लागत नाही. वीज गुल झाल्यास मुलांना अभ्यास करण्यात व्यत्यय येतो. त्यात सध्या कडक उन्हाळा सुरु झाला असून, सर्वचजण उन्हाच्या काहिलीने त्रस्त आहेत. वीज गायब होत असल्याने याचा मनस्ताप सर्वानाच सहन करावा लागतो. याचा सर्वाधिक फटका उद्योजक व परीक्षार्थी विद्यार्थी व विद्यार्थींनीना बसतो. वीज मंडळाने कोणाच्या भावनांशी न खेळता व कोणाचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची जाणीव ठेवून परीक्षा कालावधीत वीज कंपनीने वीज गायब न करता सुरळीत व अखंडितपणे वीज पुरवठा सुरु ठेवावा, अशी मागणी दिपकभाऊ ताटे यांनी केली आहे.