चऱ्होलीत बालगोपाळांच्या चेहऱ्यावर शिवजयंतीचा आनंद ओसंडला
सत्यविचार न्युज :
आळंदी : स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाच्या चऱ्होली येथील गायत्री इंटरनॅशनल स्कूल मध्ये शिवजयंतीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. माता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणी सईबाई इत्यादी विविध रंगी वेशभूषेमध्ये नटून सजुन आलेल्या बालगोपाळांच्या चेहऱ्यावर शिवजयंतीचा आनंद ओसंडून वाहत होता. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनायक भोंगाळे, संस्थेच्या कार्यकारी संचालिका कविता भोंगाळे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन आपला आनंद व्यक्त केला.
विश्वस्त सरिता विखे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली भागवत यांनी ही सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांचा आनंद द्विगुणीत केला. याप्रसंगी काही विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आपले विचार व्यक्त केले. इयत्ता ७ वी च्या विद्यार्थीनीने उत्कृष्ट भरतनाट्यम सादर करून सर्व उपस्थितांची मने जिंकली. तसेच आठवी, नववीच्या विद्यार्थ्यांनी तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित नाट्य अतिशय उत्तम रित्या सादर करून दाद मिळवली. भगवे झेंडे, ढोल ताशांच्या गजरात आणि शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित गाण्यांच्या तालावर ठेका धरणाऱ्या विद्यार्थ्यां समवेत शिक्षकांनीही या सोहळ्याचा मनमुराद आनंद लुटला. यासाठी शाळेच्या प्राचार्या व उपप्राचार्य यांनी मार्गदर्शन केले.