अलंकापुरी परिसरात काकडा आरती हरिनाम गजरात
आळंदी : येथील पुणे आळंदी रस्त्यावरील श्री काशी विश्वेश्वर महाराज मंदिरात १९७३ पासून सुरु झालेली काकडा आरतीची परंपरा गेल्या ५० वर्षांपासून अखंड काकडा आरती सुरु आहे. यात उत्तरोत्तर वाढ झाली असून आता युवक तरुण देखील यात सहभागी झाले आहेत. नागरिक भाविकांची पहाटे पासून काकडा आरतीला गर्दी वाढत आहे. माऊली मंदिरासह श्री ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर तसेच विविध मठ, मंदिरे, धर्मशाळा परिसरात विविध गावांमध्ये ही काकडा आरतीची परंपरा जतन केली जात आहे.
काळेवाडी येथील श्री काशी विश्वेश्वर विठ्ठल मंदिरात कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुरारी पौर्णिमे पर्यंत काकड आरती चे आयोजन करण्यात आले आहे. श्री काशी विश्वेश्वर मंदिरात पहाटे पाच ते सात या वेळेत धार्मिक कार्यक्रम कार्तिक स्नान, काकड आरतीची सुमधुर अभंग ,भजन ,गवळणी, गायन असे कार्यक्रम होत आहे. त्रिपुरारी पौर्णिमेला काकडा आरती समाप्ती सोमवारी ( दि. २७ ) काल्याचे किर्तन ह. भ. प. भागवत महाराज भारती यांचे होणार आहे. पाच ते सात पहाटे काकडा आरती, ९ ते १० ग्राम प्रदक्षिणा दिंडी, १० ते १२ काल्याचे किर्तन ,१२ नंतर महाप्रसाद होईल. काकड आरती साठी शाबाजी काळे गुरुजी, बाबुराव काळे, प्रकाशशेठ काळे, ऍड बंडूनाना काळे, धनाजी काळे, हनुमंत तापकीर, रामदास महाराज निकस, भागवत भारती. एकनाथ चौधरी, कार्तिक महाराज, चंद्रकांत जाधव, दुष्यंत तांबोळकर, कोकाटे महाराज, किरण काळे, बाळासाहेब वाजे, वाघजाई महिला भजनी मंडळ तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
श्री काशी विश्वेश्वर महाराज मंदिरात काकडा आरतीचा उपक्रम यावर्षी ही सुरु करण्यात आला असल्याची बंडूनाना काळे यांनी दिली. यात विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत. काळेवाडी मधिल नागरिकांच्या माध्यमातून हा उपक्रम अखंड सुरु आहे. यात दैनंदिन काकड आरती, भजन व महापूजा आदींचा समावेश आहे. या वर्षीची सांगता काकडा आरती महापूजा, ग्राम दिंडी प्रदक्षिणा, काल्याचे हरिकीर्तन आणि महाप्रसाद वाटपाने होणार आहे. आळंदी काळेवाडी ग्रामस्थांच्या वतीने या काकडा आरतीचे परंपरेने आयोजन करण्यात आले आहे.
गेल्या अनेक वर्षां पासून काळेवाडीतील श्री काशीविश्वेश्वर महाराज मंदिरात काकडा आरती उत्सवात विविध अभंग आणि किर्तन, गायनाने भल्या पहाटे पासून भक्ति मंगलमय वातावरणात काकडा आरती व प्रसाद वाटप सुरु झाले आहे. या मंदिराचा नुकताच जीर्णोद्धार करण्यात आल्याने मंदिरही प्रशस्त झाले आहे. यामुळे मंदिरात परिसरातून भाविकांची उपस्थिती वाढली आहे. आळंदीत वारकरी संप्रदाय आणि संत परंपरेची विचारधारा काकडा आरतीने ही समाजात रुजली आहे. तीर्थक्षेत्र आळंदीतील माऊली मंदिरासह विविध मठ, मंदिरे, धर्मशाळासह आळंदीतील पंचक्रोशीतील विविध गावांमध्ये ही काकडा आरतीची परंपरा जतन केली जात आहे. यात युवक तरुणांचा सहभाग देखील लक्षणीय आहे.
अडबंगनाथ मंदिरात काकड आरती सुरू
डुडुळगाव ( ता. हवेली ) येथील अडबंगनाथ मंदिरात देखील काकड आरतीचा धार्मिक कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. या ठिकाणी नियमित पहाटे चार ते साडेसात पर्यंत धार्मिक कार्यक्रम, काकडा, आरती सह भजन कीर्तन, प्रवचन आदी धार्मिक कार्यक्रम पहाटे मंगलमय वातावरणात सुरु झाले आहेत. यासाठी डुडूळगाव ग्रामस्थांसह परिसरातील भाविक भक्त यांची उपस्थिती वाढत आहेत. डुडूळगाव येथील धार्मिक पंथातील ज्येष्ठ नागरिक तसेच तरूण वर्ग, महिला व भाविक या ठिकाणी पहाटे काकड आरतीचा अनुभव घेत आहेत.