Chakan : चाकणच्या वाहतूक कोंडी विरोधात औद्योगिक वसाहत राहणार बेमुदत बंद, नागरिकांचा निर्धार
तळेगाव-चाकण-शिक्रापूर व पुणे-नाशिक रस्त्याच्या (Chakan)दुरावस्थेबद्दल व नित्याच्या वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर रविवार (दि.२८ जुलै ) रोजी बैठक चाकण येथे पार पडली.
बैठकीमध्ये तळेगाव-चाकण-शिक्रापूर व पुणे नाशिक रस्त्याची झालेली दुरवस्था व कित्येक वर्षे रस्त्याचे प्रलंबित असलेले काम पूर्ण होण्यासाठी स्थानिक नागरिकांनी ठोस उपाय योजना करण्यासाठी सविस्तर चर्चा केली. काही नागरिकांनी नक्की कोणत्या उपाय योजना केल्यावर वाहतूक कमी होईल तर, काही नागरिकांनी कुठे पाठपुरावा व कुठे सरकारला धारेवर धरल्यावर रस्त्याचे काम होईल याबद्दल आपल्या सूचना मांडल्या. यावेळी बैठकीला स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे उपस्थित होते.
नागरिकांनी अनेकवेळा प्रशासनाला निवेदने दिले आहे. त्यावर सरकार किंवा प्रशासन फक्त आश्वासनाची खैरात करत आहे. आता स्थानिक नागरिक म्हणून आपल्यालाच काही तरी ठोस उपाययोजना कराव्या लागतील त्या दृष्टीने नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत आता शेवट जिल्हाधिकारी व सर्व रस्त्याशी संलग्न विभागाला निवेदन देऊन त्यांना ९ ऑगस्ट क्रांती दिनापर्यंत वेळ देण्यात यावी. अन क्रांती दिनापर्यंत प्रशासनाने आपल्या मागण्यावर उचित कार्यवाही केली नाही तर, क्रांती दिनापासून बेमुदत चाकण औद्योगिक वसाहत पूर्णतः बंद करण्याचा निर्वाणीचा इशारा स्थानिक नागरिकांच्याकडून देण्यात आला आहे. आमच्या कुटुंबातील तसेच आमच्या जवळच्या व्यक्ती याच रस्त्याच्या समस्येमुळे आम्हाला सोडून गेल्या आहेत. तर, काही कुटुंबातील कर्ते माणूस गेल्याने ती कुटुंब उघड्यावर पडली आहेत. त्यांच्या वेतना आणि यातना या निगरगट प्रशासनाला काय समजणार? त्यासाठी आता नागरिक म्हणून आम्हालाच कृती करण्याची वेळ आली आहे. आणि कृती कशी आणि काय करायची हे स्थानिक नागरिकांना चांगले माहित आहे, अशी उद्विग्न भावना उपस्थित नागरिक बोलून दाखवत होते.
आजच्या बैठकीत आता माघार नाही असा सर्वानुमते नारा दिला. आता वाट्टेल ते करू पण रस्त्याच्या विषयासाठी मागे हटणार अशी शपथच बैठकीत स्थानिक नागरिकांनी घेतली आहे.