चाकण डॉक्टर्स असोसिएशनच्या मॅरेथॉन स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद,
चाकण : प्रतिनिधी
चाकण येथे चाकण डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने चाकण परिसरातील डॉक्टर्स व हॉस्पिटल स्टाफ करीता आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेला डॉक्टरांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती चाकण डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. असित आरगडे यांनी दिली.
डॉक्टर्समध्ये व समाजामध्ये स्वतच्या आरोग्याविषयी जागृती निर्माण व्हावी व इतरांना दिलासा मिळावा. याकरिता चाकण येथे ही स्पर्धा घेण्यात आली. एकूण ३,५ व १० किमी अंतरासाठी चाकण शहर बाजारपेठ मधून या स्पर्धेचे आयोजन असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. असित आरगडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या निमित्ताने चाकण परिसरातील १०० हून अधिक मान्यवर डॉक्टरांनी चाकण शहरातून दौड घेतली. या दौडचे चाकण शहरातील नागरिकांनी जोरदार स्वागत केले. या मॅरेथॉन स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून फिटनेस आयकॉनचे मार्गदर्शक डॉ. धनराज हेळबे उपस्थित होते. ” डॉक्टरांना खूप मोठ्या प्रमाणात ताण तणावांना सामोरे जावे लागते. स्वतच्या आरोग्याकडे लक्ष देणे हे सर्वांचे प्रथम कर्तव्य आहे आणि त्यासाठी कधीही उशीर झालेला नसतो. तेव्हा आजपासूनच सर्वांनी व्यायाम सुरू करावा, असे आवाहन डॉ. हेळबे यांनी केले.
चाकण डॉक्टर्स असोसिएशन व कोटक बॅंक यांच्या सहकार्याने या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. प्रशांत शेलार यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. असित आरगडे यांनी आभार मानले.