वार्धक्याची चिंता, त्यात करोनाची भर! वाढत्या दबावानंतर निवडणुकीतून माघार घेण्याबाबत बायडन ‘पॉझिटीव्ह’
जो बायडन यांची करोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याने राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीतून माघार घेण्याच्या चर्चा अधिक जोर धरु लागल्या आहेत.
अमेरिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून डेमोक्रॅटीक पक्षाचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प हे या निवडणुकीमधील उमेदवार आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून वार्धक्याच्या कारणास्तव जो बायडन यांनी निवडणुकीतून माघार घेऊन एखाद्या तरुण डेमोक्रॅटीक नेत्याच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा करावा, असा दबाव त्यांच्यावर वाढत आहे. ८१ वर्षाचे जो बायडन बोलताना अडखळतात आणि चालताना धडपडतात. अशातच आता त्यांच्यासमोरचं संकट आणखी वाढलं आहे. जो बायडन यांची करोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याने राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीतून माघार घेण्याच्या चर्चा अधिक जोर धरु लागल्या आहेत. आतापर्यंत माघार न घेण्याबाबत ठाम असलेले बायडनदेखील आता माघार घेण्याचा विचार करु लागल्याचे वृत्त आहे.
जो बायडेन यांना झालंय काय? चर्चमध्ये पाद्रीने उठण्याची विनंती केल्यानंतरही बायडेन तंद्रीतच बसून राहिले
‘माघार घ्या!’ बायडन यांच्या आधीही या डेमोक्रॅटीक राष्ट्राध्यक्षावर आली होती दबावातून माघार घेण्याची वेळ
ब्रिटनमध्ये मजूर पक्षाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार… कीर स्टार्मर!
वादाच्या पहिल्या फेरीत बायडेन निस्तेज; अमेरिकेच्या डेमोक्रॅटिक पक्षात उमेदवारीवरून चिंता
जो बायडन यांची करोना चाचणी पॉझिटीव्ह
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी आपली करोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याची माहिती आपल्या ‘एक्स’ अकाऊंटवरुन दिली आहे. बायडन म्हणाले, “आज दुपारी माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मात्र अमेरिकेच्या लोकांसाठी माझं काम सुरु राहिल.” अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे डॉक्टर केविन ओ कॉनर यांनी सांगितलं की जो बायडन यांच्यात करोनाची काही सौम्य लक्षणं दिसत आहेत. त्यांना सर्दी आणि खोकला झाला आहे. तसंच त्यांना बराच थकवाही जाणवतो आहे. त्यांचा करोना चाचणी अहवाल सकारात्मक आल्यानंतर आम्ही त्यांना अँटी व्हायरल डोस पॅक्सलोव्हिड दिला आहे. सध्या त्यांची प्रकृती बरी आहे. व्हाइट हाऊसनेही याबद्दल माहिती दिली आहे असं डॉक्टर म्हणाले.
निवडणुकीतून माघार घेण्याविषयी वाढता दबाव
राष्ट्राध्यक्ष जो बायडन बोलताना बऱ्याचदा अडखळतात आणि चाचपडतात. पहिल्या प्रेसिडेन्शियल डिबेटमध्ये ते मुद्दे मांडण्यामध्ये फिके पडल्याने त्यांची उमेदवारी नाकारली जावी आणि नवा उमेदवार उभा करावा, असा एक मतप्रवाह डेमोक्रॅटिक पक्षामध्ये प्रबळ होऊ लागला. डेमोक्रॅटीक पक्षाचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि माजी स्पीकर नॅन्सी पेलोसी अशा मातब्बर नेत्यांकडूनही ही मागणी जोर धरु लागली आहे. बायडन आणि ट्रम्प यांच्यातील पहिल्या डिबेटमध्ये जो बायडन यांना फारसा प्रभाव टाकता आला नाही. ट्रम्प यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीमध्ये असत्य कथन केले असले तरीही त्यांच्या बोलण्यामध्ये आत्मविश्वास दिसत होता. त्या तुलनेत बायडन यांचे वक्तव्य किंचित कमी पडत होते. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्या शक्तिमान आणि चतुर प्रतिस्पर्ध्याशी मुकाबला करण्यासाठी तब्येतीने ठीकठाक आणि तंदुरुस्त असा उमेदवार असायला हवा, असे अनेक डेमोक्रॅट्सचे मत आहे.
माघार घेण्याचा बायडन यांच्याकडून गंभीरपणे विचार
माघार घेण्याचा बायडन यांच्याकडून गंभीरपणे विचार वाढत्या दबावानंतर जो बायडन निवडणुकीतून माघार घेण्याबाबत खरोखर गंभीरपूर्वक विचार करत आहे, अशी माहिती सूत्रांनी रॉयटर्सला दिली आहे. डेलावेअरचे डेमोक्रॅटिक सिनेटर ख्रिस कुन्स यांनी म्हटले की, बायडन या शनिवारी आणि रविवारी विश्रांती घेतील आणि त्यांचा निर्णय कळवतील. सिनेटर ख्रिस कुन्स हे बायडन यांचे निकटवर्तीय मानले जातात. बायडन सध्या करोना संक्रमणामुळे डेलावेअरमधील त्यांच्या घरी क्वारंटाईनमध्ये आहेत. असोसिएटेड प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, ओबामा यांनी त्यांच्या सहकारी डेमोक्रॅट्सना सांगितले आहे की बायडेन यांना त्यांच्या टिकाव धरुन राहण्याच्या क्षमतेबाबत पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे. मात्र, या निर्णयावर सर्वस्वी बायडन यांनीच विचार करायला हवा, असेही ओबामा यांनी स्पष्ट केले आहे. स्पीकर नॅन्सी पेलोसी यांनीही असा दावा केला आहे की बायडेन आता ट्रम्प यांना पराभूत करू शकत नाहीत. वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, पेलोसी यांना असे वाटते की, बायडन स्वत:हून निवडणुकीच्या शर्यतीतून माघार घेतल्याचे लवकरच कळवू शकतात. बायडन यांनी या निवडणुकीतून माघार घ्यावी, अशी मागणी डेमोक्रॅटीक पक्षातील अनेक सिनेटर्स आणि गव्हर्नर्सनी उघडपणे केली आहे.
न्यूयॉर्क टाइम्सने राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या जवळच्या अनेक लोकांच्या हवाल्याने अशी माहिती दिली आहे की, आपण ५ नोव्हेंबर रोजी होणारी निवडणूक जिंकू शकणार नाही, हे वास्तव जो बायडन यांनी स्वीकारलं आहे. पुढे न्यूयॉर्क टाइम्सने असे म्हटले आहे की, बायडन लवकरच निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा करु शकतात आणि त्यांच्याऐवजी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस त्यांची जागा घेतील, असा निर्णय देऊ शकतात. मात्र, सध्यातरी जो बायडन यांनी निवडणुकीतून माघार घेणार असल्याचे अद्यापतरी घोषित केलेले नाही. मी शेवटपर्यंत लढा देत राहीन, असेच त्यांनी वारंवार म्हटले आहे. बायडन यांच्या प्रचार मोहिमेचे को-चेअर सेड्रिक रिचमंड यांनी बायडन यांच्याकडून माघार घेतली जाईल, अशा प्रकारच्या वृत्तांना नाकारले आहे. अशाप्रकारच्या बातम्या “पूर्णपणे चुकीच्या” असल्याचे त्यांनी म्हटले