Maharashtra Police Recruitment : पोलीस भरतीसाठी एकापेक्षा जास्त अर्ज करणाऱ्यांना द्यावी लागणार लेखी हमी
सत्यविचार न्यूज :
राज्यात 17 हजार 531 जागांसाठी पोलीस भरती जाहीर ( Maharashtra Police Recruitment) करण्यात आली. त्यासाठी 30 एप्रिल पर्यंत अर्ज मागविण्यात आले. पोलीस भरतीसाठी उमेदवाराला एक अर्ज करता येईल अशी अट असताना काही उमेदवारांनी एकापेक्षा जास्त घटकांमध्ये अर्ज केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रशासनाने संबंधित उमेदवारांकडून लेखी हमी घेण्याचे ठरवले आहे.
विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीणकुमार पडवळ यांनी याबाबत परिपत्रक जारी केले आहे. सन 2022-23 पोलीस शिपाई भरतीमध्ये एकाच पदासाठी विविध घटकात एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केले आहेत. त्यामुळे त्या उमेदवारांनी त्यांच्या वास्तव्याच्या जिल्ह्यातील पत्त्यानुसार यादी तपासून हमीपत्र सादर करावेत.
उमेदवारांचा एका पदासाठी एकच अर्ज ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस कार्यालयामध्ये उमेदवारांना समक्ष हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. एका पदासाठी एकच अर्ज ग्राह्य असून अनेक अर्ज केल्याची माहिती कार्यालयाने द्यावी व एकच अर्ज ग्राह्य धरण्यात येईल, अशी समज संबंधित उमेदवाराला द्यावी असे आदेशामध्ये म्हटले आहे. याबाबतचे आदेश संबंधित सर्व घटक प्रमुखांना देण्यात आले आहेत.
उमेदवारांनी पोलीस कार्यालयात हजर राहून एकापेक्षा जास्त घटकांसाठी अर्ज केले असतील तर त्यातील एका घटकासाठी तपशील द्यावयाचा आहे. ही माहिती 17 मे 2024 पर्यंत घटकप्रमुखांना वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करावे लागणार ( Maharashtra Police Recruitment) आहेत.