Pune : मतदानादिवशी पुण्यात पावसाची शक्यता
सत्यविचार न्यूज :
पुण्यात 13 मे रोजी लोकसभेसाठी मतदान होणार आहे. मात्र 13 मे रोजी हवामान ( Pune) खात्याने पुणे व आसपासच्या परिसरात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.
शहरात गेल्या आठवड्यापासून कमाल तापमान सरासरीपेक्षा सातत्याने जास्त नोंदले जात आहे. येत्या सोमवारी लोकसभेसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे हवामान खात्याच्या या अंदाजाला महत्त्व आले आहे.
शहरात मंगळवारी कमाल तापमान 39.3 इतके नोंदवले गेले. पुढील चार दिवस म्हणजे शनिवारपर्यंत (दि.11) आकाश सकाळी मुख्यतः निरभ्र, तर दुपारनंतर अंशतः ढगाळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल, असा अंदाज आहे.
शहर आणि परिसरात रविवार (दि.12) आणि सोमवार (दि.13) या दोन्ही दिवशी आकाश मुख्यतः ढगाळ राहून मेघगर्जनेसह पावसाच्या सरी पडतील. राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान अकोला येथे 43.7 अंश सेल्सिअस होते. राज्यात उन्हाचा चटका त्रासदायक ठरत आहे.
दरम्यान, बुधवारी (दि.8) मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह, विदर्भात गारपिटीसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे.
पूर्व विदर्भापासून तेलंगण, अंतर्गत कर्नाटक ते उत्तर तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. राज्यात उकाडा कायम असून, पावसाला पोषक हवामान होत आहे. बुधवारी मराठवाडा, विदर्भात वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाच्या सरी ( Pune) कोसळण्याचा इशारा देण्यात आला आहे.