वारकरी संत विचार महापरिषद महाराष्ट्र बहुउद्देशीय संघटनेची स्थापना
धर्माचे पालन ! करणे पाखांड खंडन !! घोषवाक्य
ह. भ. प. प्रशांत महाराज मोरे यांचे सहभागास आवाहन
सत्यविचार न्यूज :
महाराष्ट्रातील विचारवंत, कीर्तनकार, विद्वान मंडळी, फडकरी यांनी व्यक्त केलेल्या भावनांचा विचार करून ” वारकरी संत विचार महापरिषद महाराष्ट्र ” ही भागवत धर्मा बरोबरच मानवता धर्म जतन करण्यास आणि संत विचारांचा आचार, प्रचार या अनुषंगाने काम करणारी बहुउद्देशीय संघटना स्थापन करीत आहे. अशी माहिती संत तुकाराम महाराज यांचे ११ वे वंशज ह. भ. प. प्रशांत महाराज मोरे देहूकर यांनी दिली.
या संघटनेचे धर्माचे पाळण । करणे पाखांड खंडण॥ हे ब्रीद वाक्य असून ही संघटना संपूर्ण महाराष्ट्रात गावोगावी तळागाळा पर्यंत काम करील. यात विविध ठिकाणी गुरुकुल स्थापन करून सुसंस्कारीत समाज घडवणे, रंजल्या गांजल्याना सवलतीच्या दरात वैद्यकीय सेवा, अनाथाश्रम, वृद्धाश्रमाची स्थापना करणे. गोर गरीब विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणास मदत करणे. यात शालेय साहित्य वह्या, पुस्तके, कपडे आणि इतर साहित्याची मदत करणे. तीर्थ क्षेत्रांच्या ठिकाणी संत विद्यापीठ स्थापन करणे, स्वच्छता अभियान, अंधश्रद्धा निर्मुलन या संबंधी कार्य करणे, गावोगावी गुरुकुला बरोबरच मंदीरे बांधण्याचे नियोजन करून संत विचारांना अधिष्ठाण प्राप्त करून देणे. टाळ, पखवाज, विना याचे वितरण करणे. वृक्षारोपण, संवर्धन आणि पवित्र चंद्रभागेला मिळणाऱ्या सर्व नद्यांचे परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.
दरवर्षी संत विचारांनुसार कार्य करणाऱ्या व्यक्तीस किंवा संस्थेला सर्वोच्च पुरस्कार प्रदान करणे अशा इतर अनेक ध्येय,उद्दीष्ट पूर्तीसाठी ही संघटना प्रामाणिक पणे कार्य करणार असल्याचे मोरे महाराज यांनी सांगितले. या संघटेनेचा स्थापना शुभारंभ सोहळा जगद्गुरु तुकोबारायांच्या अमृत महोत्सवी त्रिशतकोत्तर सदेह वैकुंठगमन वर्षा निमित्त श्री क्षेत्र देहू येथे येत्या काही दिवसात करण्यात येईल. या बाबतचा विस्तृत कार्यक्रम संबंधीत तारीख सर्वांना लवकरच कळवण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील विद्वान, कीर्तनकार, फडकरी, विचारवंत या स्थापना सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.