उन्हाच्या झळायांनी मजूर व कष्टकरी कामगारांची दमछाक,. चाकण एमआयडीसीतील रस्ते पडले ओस,.
सत्यविचार न्यूज :
उन्हाचा पारा दिवसेंदिवस प्रचंड वाढत चालला असून, रखरखत्या उन्हात बाहेर फिरणे खूपच अवघड झाले आहे. कडक उन्हाची झळ नागरिकांना सहन करावी लागत आहे. सूर्य दिवसभर आग ओकत असल्याने सूर्य किरणांपासून बचाव करताना चाकण एमआयडीसीतील मजूर, नागरिक व कष्टकरी कामगारांची अक्षरशः दमछाक होत आहे.
चाकण भागातील तापमान सध्या ४० अंश सेल्सिअस आहे. या आठवड्यात चाकणसह परिसरातील हेच तापमान वाढण्याची शक्यता आहे. चाकणसह औद्योगिक क्षेत्रात, गावोगावी, वाडी वस्तीवर, शेत शिवारात इतक्या वाढीव तापमानाची नागरिकांना सवय नसल्याने सर्वांच्या अंगाची लाही लाही होत आहे. त्यामुळे कामाशिवाय लोक घराबाहेर किंवा कामाच्या ठिकाणांहून सकाळी नऊ ते दुपारी चार या दरम्यान बाहेर पडणे टाळत आहेत. पाणी टंचाईच्या झळा सुद्धा यंदा वाढीव तापमानामुळे बसू लागल्या आहेत. भाजीपाला व अन्य पिकेही सुकू लागली आहेत. सध्या कामानिमित्त घरातून बाहेर चाललेले नागरिक उपरणे, टोपी, रुमाल आदींचा वापर करू लागले आहेत.
उष्ण लाटेच्या पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसांत पाऱ्यात आणखी वाढ होऊन उन्हाची तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उन्हाच्या तीव्रतेने दुपारी रस्ते ओस पडू लागले असून, बाजारपेठेवरही उन्हाचा परिणाम जाणवू लागला आहे. तापमानात वाढ होत असल्याने आजारांना निमंत्रण मिळत असून, वाढत्या उन्हामुळे आरोग्याच्या समस्या उदभवू लागल्या आहेत.
————————————–
” नागरिकांनी उन्हाळ्याच्या दिवसात स्वतःच्या जीवाची काळजी घेणे गरजेचे आहे. वाढलेल्या उन्हामुळे गॅस्ट्रोसारखी साथ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी शरीरातील पाण्याची पातळी व्यवस्थित राहील, यासाठी लिंबू सरबत, उसाचा ताजा रस, पाणीदार फळे घेणे आवश्यक आहे. उन्हातून घरी आल्यावर लगेच पाणी पिणे शक्यतो टाळावे. शरीरातील पाण्याची पातळी योग्य राहील, याची दक्षता घ्यावी.” – डॉ. अमोल बेनके, चाकण,.
———————————————–