आळंदीत परिचय भागवत धर्माचा ओळख ज्ञानेश्वरीची पुस्तिका प्रकाशन
श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान तर्फे लोकार्पण
सत्यविचार न्यूज :
गुढीपाढव्यासह मराठी नववर्ष निमित्त श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात संत ज्ञानेश्वर महाराज यांचे संत साहित्याचा प्रसार आणि प्रचार कार्यातील उपक्रम असलेल्या ओळख श्री ज्ञानेश्वरीची या उपक्रमासाठी अभ्यास पुस्तिका तयार करण्यात आला आहे. परिचय भागवत धर्माचा ओळख ज्ञानेश्वरीची या अध्यापकांसाठी मार्गदर्शक अभ्यासक्रम पुस्तिकेचे प्रकाशन व लोकार्पण माऊली मंदिरात श्रींचे संजीवन समाधीला स्पर्श करीत हरिनाम गजरात करण्यात आले.
श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती, आळंदी पत्रकार संघ या संस्थांच्या माध्यमातून राज्यातील शाळांत ओळख श्री ज्ञानेश्वरीची हा शालेय मुलांना अधिक संस्कारक्षम करण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून उपक्रम सुरु आहे. या उपक्रमाचे पालकत्व श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीने गेल्या वर्षांपासून स्वीकारले आहे. या अंतर्गत अध्यापकांना मार्गदर्शक अशी पुस्तिका अर्थात अभ्यासक्रम सर्वत्र एक सारखा उपक्रम राबविला जावा. यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थांन कमेटीचे माजी प्रमुख विश्वस्त डॉ. अभय टिळक यांची संकल्पना आणि संकलन असलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन माऊलींचे संजीवन समाधीला स्पर्श करीत झाले.
या पुस्तिकेचे प्रकाशन आणि लोकार्पण आळंदी देवस्थानचे विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजनदासजी, माजी विश्वस्त डॉ. अभय टिळक, श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, आळंदी पत्रकार संघाचे प्रतिनिधी अर्जुन मेदनकर, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर, संकलन सहाय्यक उमेश महाराज बागडे यांचे हस्ते झाले. यावेळी समितीचे सेक्रेटरी विश्वम्भर पाटील, विलास वाघमारे, अध्यापक पुरुषोत्तम महाराज हिंगणकर, प्राचार्य पांडुरंग मिसाळ, वासुदेव महाराज शेवाळे यांचेसह उपक्रमात सहभागी शिक्षणसंस्था चालक, अध्यापक, भाविक वारकरी, नागरिक उपस्थित होते.
या ऐतिहासिक क्षणांचे आपण भागीदार होण्याचे आपणा सर्वाना भाग्य लाभल्याचे समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे यांनी सांगतले. ओळख श्री ज्ञानेश्वरी अध्यापक अभ्यासक्रम मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन पहिल्या टप्प्यातील असून अधिक विस्तृत आणि सविस्तर अभ्यासक्रम तयार केला जाईल. या मराठीतील पुस्तिकेचे प्रकाशन झाले असून यापुढील काळात हिंदी आणि इंग्रजी मध्ये देखील ते उपलब्ध होण्यासाठी डॉ. टिळक आणि सर्व सहकारी यांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे विश्वस्त योगी निरंजननाथजी यांनी सांगितले. या उपक्रमास संस्थांनचे सर्वोतोपरी साहाय्य राहील असे सांगत उपक्रमाची माहिती देत संवाद साधला. यावेळी डॉ. अभय टिळक यांनी या अभ्यासक्रम मार्गदर्शिकेची माहिती देत अधिक उपयुक्त कशी होईल यासाठी पुढील काळात सेवा कार्य केले जाईल असे सांगत उपस्थितांना मार्गदर्शन केले. आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त विधीतज्ञ राजेंद्र उमाप यांनी प्रस्तावना देत उपक्रमास असेच सहकार्य यापुढील काळात ठेवण्याचे आवाहन केले. या साधन साहित्य पुस्तिकेत २५ अभ्यास घटक समाविष्ठ करण्यात आले आहेत. यातील पहिल्या गटात ९ आणि दुसऱ्या गटात १६ घटक आहेत. शालेय मुलांचे वय आणि आकलन क्षमता विचारात घेऊन मार्गदर्शिका तयार करण्यात आली आहे. यात संतांचे बोल, वारकरी संतांचे परंपरेतील १० संत विभूतींचे अभंग, श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील सुमारे १०० वर ओव्यांचा समावेश या अभ्यास पुस्तिकेत करण्यात आला असल्याचे डॉ. अभय टिळक यांनी सांगितले. या प्रसंगी आळंदी देवस्थानचे वतीने डॉ. अभय टिळक, उमेश महाराज बागडे, व्यवस्थापक माऊली वीर यांचा उपक्रमास सहकार्य केल्या बद्दल सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी सूत्रसंचालन अजित वडगावकर यांनी केले. आभार प्रकाश काळे यांनी मानले. पसायदान आणि महाप्रसाद वाटपाने प्रकाशन लोकार्पण सोहळ्याची सांगता हरिनाम गजरात झाली.