राष्ट्रीय योगासन स्पर्धेत गायत्री नाणेकर यांना रौप्यपदक,
सत्यविचार न्युज :
चाकण : प्रतिनिधी
महिला व तरुणींसाठी उत्तरप्रदेश राज्यातील अमरोहा येथे घेण्यात आलेल्या चौथ्या वरिष्ठ राष्ट्रीय योगासन स्पर्धेत येथील गायत्री विजय नाणेकर यांनी रौप्यपदक पटकावले. त्यांच्या या अतुलनीय आणि उत्तुंग कामगिरीबद्दल त्यांच्यावर सर्वच स्तरातून कौतुकांचा वर्षाव होत आहे. उत्तरप्रदेश राज्यातील अमरोहा येथे उत्तरप्रदेश योगासना स्पोर्टस असोशिशएनच्या सहकार्याने दि. ११ मार्च ते २२ मार्च २०२४, या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या राष्ट्रीय योगासन स्पर्धेत संपूर्ण भारतातून एकूण २८ राज्यांतील तरुणी व अष्टपैलू महिला स्पर्धकांनी भाग घेतला होता. गायत्री नाणेकर यांनी या राष्ट्रीय योगासन स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करताना रौप्यपदक जिंकून महाराष्ट्र व पुणे जिल्ह्याचे नाव संपूर्ण देशात झळकविले आहे. यापूर्वी गायत्री यांनी राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय या दोन्ही स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून चाकण, शिरूर, मंचर व भोसरी आदि गावांचे नाव सर्वत्र उंचावले आहे. ” आई – वडिलांचे आशीर्वाद, भावांची प्रेरणा, कुटुंबाचे विशेष सहकार्य, योगशिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन, नियमित केलेला सराव आदींमुळे मला हे उत्तुंग यश मिळाल्याचे नाणेकर यांनी सांगितले. प्रयत्न, जिद्द, चिकाटी, प्रचंड आत्मविश्वास आणि धाडस केल्यास हमखास यश मिळते. त्याकरिता उत्तुंग आत्मविश्वास व निर्धार करणे गरजेचे आहे.”