तळवडे येथे उड्डाणपुल उभारण्याची विनोद महाळुंगकर यांची मागणी; सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त
सत्यविचार न्युज :
वाहतूक कोंडी मुक्तीसाठी तळवडे आय टी पार्क ते त्रिवेणीनगर पर्यंत उड्डाणपूल रस्त्याची मागणी
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या भागात उड्डाणपूल तयार करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय वारकरी महामंडळाचे संपर्क प्रमुख विनोद महाळुंगकर पाटील यांनी प्रशासनाकडे व लोकप्रतिनिधींकडे केली आहे.
अरुंद गणेशनगर चौकामुळे त्रिवेणीनगर चौक ते तळवडे चौक रस्त्यावर दररोज सकाळी व सायंकाळी तीव्र वाहतूक कोंडी होते. बेशिस्त व विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहन चालकांमुळे अपघातात भर पडत आहे. या वाहतूक कोंडीमुळे कामगार व नागरिक त्रस्त झाले आहेत.त्रिवेणीनगर, तळवडे भागात वाहतूक समस्येला स्थानिक नागरिक व वाहन चालकांना दररोज सामोरे जावे लागत आहे. पिंपरी-चिंचवड शहर व चाकण ‘एमआयडीसी’ला जोडणारा तळवडे-निगडी हा एकमेव रस्ता आहे. या रस्त्यावर ४० फूट व त्यापेक्षा लांबीची वाहने व कंटेनर यांची नेहमी वर्दळ असते. त्यामुळे तीन किलोमीटरच्या प्रवासाकरिता कधीकधी दोन ते तीन तास वाहतूक कोंडी होत असते.
तळवडे गाव १९९७ मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीमध्ये आल्यामुळे गावामध्ये लोकवस्ती मोठ्या प्रमाणात वाढली. येथे घरे व छोटे उद्योग वाढले. तसेच इंद्रायणी नदीवर पूल झाल्याने चाकण एमआयडीसीमध्ये जाण्यासाठी जवळचा मार्ग उपलब्ध झाला. त्यामुळे गावामध्ये वाहतूक कोंडी वाढली
निगडी प्राधिकरणातील त्रिवेणीनगर चौक हा एक महत्त्वपूर्ण व मोठा चौक आहे. येथून तळवडे व पुढे तळवडे आयटी पार्क व चाकणला जाता येते. त्यामुळे त्रिवेणीनगर चौक ते तळवडे चौक या रस्त्यावर दररोज सकाळी व सायंकाळी खूप वर्दळ असते. यामध्ये ट्रक्स, मोठे कंटेनर, कंपनी बसेस जास्त असल्याने वाहतूक कोंडी होऊन लाखो नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
त्रिवेणीनगर चौकातील समस्यात्रिवेणीनगर चौक येथे स्पाइन रोड, टेल्को रोड व तळवडे रोडचे ट्रॅफिक एकत्र येते. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. या चौकात खड्डे पडले आहेत. तसेच खडी पसरल्याने दुचाकी वाहने घसरून पडल्याचे प्रकारही घडत असतात.
गणेशनगर चौकातही कोंडीगणेशनगर चौक येथे रोड ‘एस’ आकाराचा आहे. त्रिवेणीनगर चौक ते तळवडे चौक हा चार पदरी रोड आहे. पण गणेशनगर चौकाच्या दोन्ही बाजूला १०० मीटरपर्यंत तो दोन पदरी असल्याने वाहतूक कोंडी होते. या चौकात खडी पसरल्याने वाहने हळू चालतात. त्यामुळे येथे वाहनांच्या लांब रांगा लागतात.