Pune : 350 किमीचा प्रवास, 600 सिसिटीव्ही फुटेज! येमेन नागरिकांना लुटणाऱ्या गँगला पुणे पोलिसांनी केली अटक
सत्यविचार न्यूज : पोलिस असल्याची बतावणी करून येमेनी नागरिकांना (Pune) लुटणाऱ्या टोळीला पुणे पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. सिंकदर अली खान, करिम फिरोज खान, इरफान हुसेन हाशमी, मेहबूब अब्दुलहमदी खान अशी अटक आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी सालेह ओथमान एहमद या येमेन नागरिकाने फिर्याद दिली आहे.
आरोपींकडून 3 हजार अमेरिकन डॉलर, 500 सौदी रियाल, 53 हजार रुपयांचे भारतीय चलन व एक गाडी जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आखाती देशातून विशेषतः येमेन या देशातून अनेक नागरिक वैद्यकीय उपचार घेण्यासाठी पुण्यात येत असतात. फिर्यादी त्यांच्या पत्नीच्या उपचारासाठी पुण्यात आले होते.
8 फेब्रुवारी रोजी ते कोंढवा परिसरातून जात असताना आरोपी त्यांच्या जवळ आले आणि अरबी भाषेत संभाषण करुन त्यांना पोलीस असल्याचे सांगितले.
फिर्यादी यांच्याकडून त्यांनी तुमच्याकडील पत्र, पैसे आणि इतर कागदपत्र दाखवा म्हंटल्यावर (Pune) आरोपींनी फिर्यादी यांच्याकडील 500 सौदी रियाल, 3 हजार अमेरिकन डॉलर, भारतीय चलनातील 53 हजार रुपये असा मुद्देमाल लंपास करून धूम ठोकली.
या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी तब्बल 600 सिसिटीव्ही फुटेज तपासले; तसेच आरोपी ज्या ठिकाणी थांबले होते, त्यावर हॉटेलवर छापेमारी करत त्यांचा धागा दिल्ली पर्यंत पोहचल्याचे निष्पन्न झाले. कोंढवा पोलिसांनी दिल्लीत जाऊन या चारही आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली. या कारवाईनंतर येमेन दुतवासाकडून पुणे पोलिसांचे कौतुक करण्यात येत आहे.