हिंजवडी येथील चादरीतील ‘त्या’ मृतदेहाचे रहस्य उलगडले
सत्यविचार न्यूज :
हिंजवडी पोलिसांना बेवारस मृतदेहाबाबत माहिती मिळाली. एक मृतदेह चादरीमध्ये गुंडाळलेला असल्याचे समजले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. चादरीत मृतदेह नव्हे, तर मृत श्वान आढळला. त्यामुळे पोलिसांसह उपस्थितांनी डोक्याला हात लावला. शिंदे वस्ती येथे बुधवारी (दि.१८) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
हिंजवडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शिंदे वस्ती येथे चादरीत गुंडाळलेल्या अवस्थेत एक मृतदेह असल्याची माहिती मिळाली. हा नक्की खुनाचा प्रकार असल्याची खात्री पोलिसांना वाटत होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेची पथकेही घटनास्थळी दाखल झाली.
गर्दी कमी करण्याचे आवाहन करीत पोलिसांनी कामकाज सुरू केले. चादरीत गुंडाळलेल्या ‘त्या’ मृतदेहाचे फोटो काढण्यात आले. घटनास्थळी दुर्गंधीही येत होती. त्यानंतर पंचनामा करण्यासाठी चादरीतून मृतदेह काढण्यास सुरुवात केली. त्यासाठी मृतदेहावरील चादर बाजूला केली असता चादरीमध्ये मनुष्याचा मृतदेह नव्हे, तर मृत श्वान आढळून आला.