चाकणला वाद्यवृंदाच्या गजरात गणेश विसर्जन
चाकण : प्रतिनिधी
चाकण येथील विद्यानिकेतन प्रशालेतील गणेश मूर्तीचे टाळ, मृदुंगाचा गजर करत व वाद्यवृंदाच्या गजरात जड अंतकरणाने विसर्जन करण्यात आले. या विसर्जन मिरवणुकीत विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या कार्यक्रमास श्री.एस.पी.देशमुख शिक्षण संस्थेचे संस्थापक साहेबराव देशमुख, अध्यक्ष शामराव देशमुख, सचिव रोहिणी देशमुख, संचालक डी.पी.सोनवणे, विद्यानिकेतनचे मुख्याध्यापक दिपक शिंदे, विद्याव्हॅली इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या स्वाती रणदिवे आदी सहभागी झाले होते. यावेळी अंतरा बोबडे हिने गणेश स्तोत्र पठण केले. यावेळी अवघा परिसर भक्तीरसात चिंब झाला होता. परिसर दुमदुमून गेला होता. शालेय विद्यार्थिनींनी यावेळी नृत्य सादर केले. समाजातील महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार याविषयी जनजागृती करण्यासाठी शालेय सहशिक्षिका संध्या वाळून यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ मी एक स्त्रीरक्षक ‘ याविषयी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांकडून प्रतिज्ञा पत्राचे वाचन करण्यात आले. स्त्री रक्षणाची जबाबदारी घेणारा शपथविधी सोहळा व गणरायाची आरती यावेळी मोठ्या दिमाखात करण्यात आली. अर्चना वायाळ यांनी आभार मानले. यावेळी सर्वांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.