चाकणची बाजारपेठ गणेश मूर्त्यांसह सजावटीच्या साहित्याने फुलली,
चाकण : प्रतिनिधी
बाप्पाच्या आगमनाची तयारी चाकण शहरात जोरदार सुरू झाली आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून गणेश मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. तर दुसरीकडे घरगुती गणेशाच्या मुर्ती बुकिंग करण्याची लगबग पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या साहित्यांनीही चाकण बाजारपेठ सजली आहे.
चाकण येथे अगदी अर्ध्या फुटापासून ते दहा फुटापर्यंत उंचीच्या दहा हजारांहून अधिक पर्यावरणपूरक गणेशमूर्ती उपलब्ध आहेत. यामध्ये दगडूशेठ हलवाई, लालबागचा राजा, बाल मूर्त, मोर गणेश, उंदीर गणेश, बालाजी गणेश, संत तुकाराम वेशभूषा गणेश, बैलगाडा गणपती, मयूर गणपती, बाहुबली, मल्हारी, भोलानाथ, कृष्णा आणि बाजीराव पेशवा आदिंच्या रूपातील मूर्त्या भक्तांचे लक्ष वेधून घेत आहेत. येथील बाजारात अर्ध्या फुटापासून दहा फुटापर्यंत गणेश मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध आहेत, अशी माहिती जनता शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष प्रा. संजय वाडेकर यांनी दिली. गणेश मूर्तीच्या ५०० रुपयांपासून ते १५ हजार रुपयांपर्यंत किमती आहेत.
चाकण बाजारपेठेतील श्री समस्त बालवीर गणेश मंडळ, नेहरू चौक येथील गणेश मंडळाच्या वतीने मागील एकवीस वर्षांपासून गणेश भक्तांना वाजवी दरात चांगल्या दर्जाच्या गणेश मूर्तीची विक्री केली जाते. हे मंडळ यावर्षी ९८ वर्षांत पदार्पण करत आहे. प्रा. संजय वाडेकर हे या मंडळाचे अध्यक्ष आहेत. या बालवीर मंडळाकडून गणेश मूर्ती विक्री आणि देखावा सजवण्यासाठी मेहनत घेतली जात आहे.