Wakad : धक्कादायक! आठ वर्षीय मुलाचे अपहरण, लैंगिक अत्याचार आणि खून
सत्यविचार न्यूज – वाकड येथे राहत्या घराजवळून आठ वर्षीय मुलाचे (Wakad )अपहरण झाले. त्याला मारहाण करून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आला. त्यानंतर त्याला मारहाण करत गळा दाबून त्याचा खून करून मृतदेह झुडुपांमध्ये फेकून दिला. हा धक्कादायक प्रकार वाकड आणि बावधन येथे घडला असून वाकड पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पवन जागेश्वरप्रसाद पांडे (वय 28, रा. नागर, माणिकपूर, जि. चित्रकुट, उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी उपायुक्त बापू बांगर (Wakad)यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथे राहणाऱ्या आठ वर्षीय मुलाचे 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा ते आठ वाजताच्या कालावधीत घराजवळून अपहरण झाल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत मुलाचा शोध सुरु केला. दरम्यान, पोलिसांनी मुलाच्या घराच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यामध्ये एक व्यक्ती मुलाला घेऊन जात असल्याचे दिसले.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मुलाला घेऊन जाणाऱ्या तरुणाची ओळख पटवून पोलिसांनी त्याला बावधन येथील त्याच्या घरातून ताब्यात घेतले. त्यावेळी तो मद्यधुंद अवस्थेत होता. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने मुलाला पळवून नेत त्याच्यावर लैंगिक अत्याचार करून त्याचा खून केला असल्याचे सांगितले.
खून करून मृतदेह फेकून दिला
पवन हा मुळचा उत्तर प्रदेश मधील असून तो दीड महिन्यापूर्वी कामाच्या शोधात पिंपरी चिंचवड शहरात आला होता. बावधन येथे राहून तो वाकड मधील एका रसवंती मध्ये काम करत होता. अपहृत मुलगा शाळेत जात नव्हता. त्याच्या घराजवळ असलेल्या रसवंती मध्ये आरोपी पवन हा मागील तीन दिवसांपासून कामाला आला होता. पवन हा दररोज मुलाला उसाचा रस प्यायला देत असे. त्यामुळे त्या दोघांची गट्टी जमली होती. 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पवन याने मुलाला वडापाव खायला देण्याचे आमिष दाखवले आणि त्याला बावधन येथे नेले.
पाषाण तलावाजवळ नेऊन तिथे त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. त्याला मारहाण केली. त्यानंतर घडलेला प्रकार मुलगा सर्वांना सांगेल, या भीतीने पवन याने मुलाला मारहाण करून त्याचा गळा आवळून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मुलाचा मृतदेह झुडुपांमध्ये फेकून दिला.
पोलिसांनी पवन याला ताब्यात घेतल्यानंतर मुलाचा मृतदेह देखील ताब्यात घेतला. सुरुवातीला अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामध्ये खून, खुनासाठी अपहरण, अनैसर्गिक लैंगिक अत्याचार, पुरावा नष्ट करणे, त्यासह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक (पोक्सो) कायदा अशी कलमवाढ केली आहे.
ही कामगिरी सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) रविकिरण नाळे, सहायक पोलीस निरीक्षक निलेश नलावडे, उपनिरीक्षक सचिन चव्हाण, अनिरुध्द सावर्डे, सहायक फौजदार बिभीषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार, राजेंद्र काळे, पोलीस अंमलदार संदीप गवारी, वंदू गिरे, स्वप्नील खेतले, विनायक म्हसकर, प्रमोद कदम, अतिश जाधव, अतिक शेख, विक्रांत चव्हाण, हनमंत कुंभार, प्रशांत गिलबिले, रामचंद्र तळपे, भास्कर भारती, अजय फल्ले, विनायक घारगे, कौंतेय खराडे, सौदागर लामतुरे, स्वप्नील लोखंडे, रमेश खेडकर, ज्ञानदेव झेंडे, सागर पंडीत यांच्या पथकाने केली.