चाकणला चुकीच्या उड्डाणपूलामुळे
वाहतूक कोंडीचा बट्ट्याबोळ,.
सत्यविचार न्युज :
विस्तारती औद्योगिक वसाहत, कामानिमित्त दाखल होत असलेले परप्रांतीयांचे लोंढे, वाढते नागरिकीकरण, वाहनांची वाढती संख्या आणि त्यात चाकण हद्दीत पुणे – नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चाकण येथील तळेगाव चौक व आंबेठाण चौकात चुकीच्या ठिकाणी बांधण्यात आलेल्या उड्डाणपूलामुळे वाहतूक कोंडीचा अक्षरश: बट्ट्याबोळ झाला आहे. सतत होणा-या वाहतूक कोंडीने नागरिक अक्षरशः हैराण झाले असून, चाकण मध्ये प्रवास नको रे बाबा असे म्हणण्याची वेळ आली आहे.
चाकण येथील तळेगाव चौक व आंबेठाण चौकातील वाहतूक कोंडीवर त्वरित उपाययोजना करू, अशा गप्पा प्रशासनाकडून नेहमीच मारल्या जातात. मात्र, कोणतीही अंमलबजावणी होत नसल्याने येथील नागरिकांमध्ये असंतोष खदखदत आहे. येथील युवकांनी अनेकदा वाहतूक विभागाला वाहतूक कोंडी मार्गी लावण्यासाठी लेखी निवेदने दिली आहेत. मात्र त्यावर अद्याप कसलीच कार्यवाही होत नसल्याने नागरिक वैतागले आहेत. चाकण येथे सर्वच चौकात वाहतूक कोंडी ही नित्याचीच समस्या बनली आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आदींना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. येथे मोठी औद्योगिक वसाहत असून, याच चौकातून चाकण औद्योगिक वसाहतीकडे हे रस्ते जात आहेत. त्यातच वाढते औद्योगिकीकरण आणि बेशिस्त वाहन चालक आणि नियोजनाचा अभाव यामुळे वाहतूक कोंडीत मोठी भर पडत आहे.
चाकण मध्ये कोणत्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होईल, याचा थांगपत्ता लागत नाही. वाहतूक कोंडी झाल्यानंतर आपण त्यात अडकले जावू आणि आपला वेळ वाया जाईल, या भीतीने अनेकजण ओव्हरटेक अथवा पुढे चाललेल्या वाहनाला मागे टाकण्याच्या प्रयत्नात अपघाताला निमंत्रण देत आहे. बेशिस्त वाहन चालकांमुळे चाकण येथील सर्वच चौकात वाहतुकीचा बट्ट्याबोळ झाला आहे.
” चाकणमध्ये चुकीच्या ठिकाणी बांधण्यात आलेले उड्डाणपूल योग्य ठिकाणी बांधणे अपेक्षित आहे. गरज नसताना नको त्याठिकाणी दुभाजक फोडण्यात आले आहेत. प्रकाश रोधक, साईड पट्ट्या, झेब्रा पट्टे, उंचावरील गतिरोधक यांची वाणवा आहे. पुढे धोकादायक वळण आहे, वाहने सावकाश चालवा, असे नामफलक आवश्यक ठिकाणी लावणे लोकहिताचे वाटते.” – रुपाली खांडेभराड, (उपसरपंच, कडाचीवाडी, चाकण)