श्रीक्षेत्र भंडारा डोंगर येथे अखंड गाथा पारायण सोहळ्यास सुरुवात
सत्यविचार न्यूज – माघ शुद्ध दशमी व जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा जन्मदिवस (Bhandara Dongar) वसंत पंचमी निमित्त श्रीक्षेत्र भंडारा डोंगर येथे अखंड हरीनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळ्याला सुरुवात झाली आहे. हा सोहळा मागील 71 वर्षांपासून केला जात आहे.
श्री विठ्ठल रखुमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्टच्या वतीने श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे माघ शुद्ध दशमी निमित्त गाथा पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार (दि. 14) ते बुधवार (दि. 21) या कालावधीत हा सप्ताह संपन्न होणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष हभप बाळासाहेब काशीद महाराज यांनी माध्यमांना दिली.
मावळचे माजी आमदार दिवंगत दिगंबर भेगडे याचे चिरंजीव मनोहर भेगडे व परिवाराच्या वतीने बुधवारी पहाटे पाच वाजता परंपरेप्रमाणे पांडुरंगाला अभिषेक व महापूजा संपन्न झाली. यावेळी माजी आमदार विलास लांडे, वाकुळणी येथील संतपीठाचे प्रमुख व गाथामूर्ती ह.भ.प. नाना महाराज तावरे, उद्योजक विजय जगताप, संत साहित्याचे अभ्यासक कीर्तनकार ह.भ.प. पंकज महाराज गावडे, माजी सभापती विठ्ठलराव शिंदे, कासारवाडी येथील दत्त आश्रमाचे मठाधिपती शिवानंद स्वामी महाराज, पिंपरी-चिंचवडचे माजी नगरसेवक आप्पा बागल, श्री क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष ह.भ.प. बाळासाहेब काशीद व सर्व विश्वस्त, भंडारा डोंगर परिसरातील इंदोरी, सुदवडी, जांबवडे, सुदुम्ब्रे आदी गावांचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या गाथा पारायण सोहळ्यासाठी मराठवाडा, विदर्भासह महाराष्ट्राच्या विविध भागातून, तसेच मध्यप्रदेश, कर्नाटक आदी राज्यातून आलेल्या भाविकांचे स्वागत श्री क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष ह.भ.प. बाळासाहेब काशीद यांनी केले.
बाळासाहेब काशीद म्हणाले, भंडारा डोंगरावरील भव्य-दिव्य मंदिर निर्माणाचे कार्य लवकरात लवकर पूर्णत्वास जाण्यासाठी वारकरी संप्रदायातील सर्व थोर कीर्तनकार, प्रवचनकार, महाराज मंडळी, तसेच तुकोबारायांवर नितांत (Bhandara Dongar) श्रद्धा असणारे, समाजजीवनात कार्यरत असणारे सर्वजण मदत करीत आहेत. मंदिराचे काम प्रगतीपथावर आहे. आजपर्यंत मंदिराचे निम्मे काम पूर्ण झाले आहे. सर्वांच्या सहकार्याने संत तुकाराम महाराजच हे पवित्र मंदिर निर्माणाचे कार्य पूर्णत्वास नेतील ,अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
असे असणार कार्यक्रमाचे नियोजन :
सप्ताहामध्ये सकाळी 7 ते 12 गाथा पारायण, दुपारी 12 ते 2 भोजन, 2 ते 4 गाथा पारायण, सायंकाळी 4 ते 6 प्रवचन, 6 ते 7 हरिपाठ, 7 ते 8 भोजन, रात्री 8 ते 10 किर्तन व रात्री 11 ते पहाटे 4 वाजेपर्यंत सार्वजनिक जागर असे कार्यक्रम होणार आहेत.
रात्री 8 ते 10 कालावधीत होणारी कीर्तन सेवा :
बुधवार दि 14 फेब्रुवारी – हभप गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली कदम (मोठे माऊली, आळंदी)
गुरुवार दि 15 फेब्रुवारी – हभप भागवताचार्य डॉ. विकासानंद महाराज मिसाळ (नगर)
शुक्रवार दि. 16 – हभप गुरुवर्य पांडुरंग महाराज गिरी (नाशिक)
शनिवार दि. 17- हभप गुरुवर्य जयेश महाराज भाग्यवंत (मुंबई)
रविवार दि. 18 – हभप गुरुवर्य बंडा महाराज (तात्या) कराडकर (कराड- सातारा)
सोमवार माघ शु दशमी दि. 19 – हभप गुरुवर्य चंद्रशेखर महाराज देगलूरकर (नांदेड)
मंगळवार दि. 20 – हभप वारकरी रत्न ज्ञानेश्वर माऊली कदम (छोटे माऊली)
बुधवार दि. 21 – काल्याचे किर्तन सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत हभप गुरुवर्य उमेश महाराज दशरथे (मानवतकर) परभणी
सोमवार (दि 19) रोजी दु. 12 ते 1.30 वा. गणेश आत्माराम शिंदे आणि सुप्रसिद्ध गायिका सन्मिता गणेश शिंदे यांचा ‘मोगरा फुलला’ हा सुश्राव्य अभंगवाणीचा कार्यक्रम तसेच दु. 2 ते 4:30 या वेळेत सुप्रसिद्ध मेघना झुझम (भिंवर पाटील) यांचा ‘तुझिया नामाचा गजर’ हा भक्तिमय कार्यक्रम होणार आहे. तसेच दि. 14 ते 20 पर्यंत सायं. 4 ते 6 कैवल्यमूर्ती संत श्री ज्ञानेश्वर महाराज तत्त्वचिंतन प्रवक्ते हभप रविदास महाराज शिरसाठ (आळंदी) यांचे होईल.
पारायण व्यासपीठ नेतृत्व हभप गाथामूर्ती नाना महाराज तावरे करतील. पारायणासाठी येणाऱ्या भाविकांसाठी निवास व भोजन व्यवस्था विनामूल्य केली आहे. पारायणासाठी येणाऱ्या भाविकांनी व्यासपीठ व देवडी कृत श्री तुकाराम महाराजाची गाथा आणावी असे आवाहन ट्रस्ट कडून करण्यात आले आहे. (Gatha Parayan And Akhand Harinam Saptah At Shri Kshetra Bhandara Dongar Maval Pune)